Monsoon 2021 : ठाणे जिल्ह्यात हायअलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
मुंबईसह कोकण विभागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या निर्देशानुसार 10 जून ते 12 जून या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने ठाणे जिल्हाधिकाऱी राजेश नार्वेकर यांनी अलर्ट परिपत्रक जारी केलं आहे.
अतिवृष्टीच्या काळात सोसाट्याचा वारा, पाऊस असतो. त्यामुळे अचानक पूर किंवा भरतीच्या वेळेत अधिक पाऊस झाल्यास किनारपट्टी भागात पाणी भरण्याची शक्यता असते. काही भागात दरड कोसळण्याचाही धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षीत ठिकाणी रहाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं महाराष्ट्रात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच उर्वरीत महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, अमरावती, नांदेड या भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.