शेवगावमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर ; पैठण येथून बोट आणण्यासाठी प्रयत्न सुरू
शेवगाव : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होत. त्यातील पहिल्या दोन दिवसांत पाऊस झाला नाही मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. डोंगरभागामध्ये तर पावसाचा जोर अधिक आहे
पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील नद्यांना जोरदार पावसामुळे पूर आला आहे. शेवगाव तालुक्यातील आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले, ठाकूर पिंपळगाव येथे पुर स्थिती निर्माण झाली असून 40 ते 50 घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याची माहिती आहे तर अनेक जनावरे पाण्यात वाहून गेल्याचे समजत आहे. तालुक्यातील नंदिनी, चांदणी, वटफळी या तीनही नद्यांना पूर आला आहे. नदीपासून जवळपास पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांनी पैठण येथून बोट आणण्यासाठी प्रयत्न सुरू केली आहे. तर ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या पुलावर एक ट्रक पाण्यात बंद झाल्याने त्यात एक जण अडकला आहे. परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली असून घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सज्ज झाल आहे.मात्र पुरेशा बोटी नसल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागासमोरही मोठा प्रश्न आहे.