नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत

Update: 2022-07-09 07:43 GMT

नांदेड - नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नांदेड शहरातील काही रस्ते पाण्याखाली गेल्याने शहर व जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अर्धापूर मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

अर्धापूर तालुक्यातील शेलगाव शिवारात गाव आणि मुख्य रस्त्याचा संपर्क तुटला असून शेतांमधून नदीचे पाणी वाहत आ. अर्धापूर, दाभड भागात अनुक्रमे ११२ आणि ११८ मिलिमीटर अशा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे शेतांमधील पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे आता तिबार पेरणीचे संकट आल्याची भावना येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे या भागातील ओढे,नाले आसना नदीत येऊन मिसळल्यामुळे नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला मोठा पूर आला आहे. या भागातील मेंढका नदीला पूर आल्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अगोदरच पावसाअभावी दुबार पेरणीच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आता या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पेरणीचे संकट निर्माण झाल्याचे चित्र जिल्हाभरात निर्माण झाले आहे.

Tags:    

Similar News