कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जिल्हा प्रशासन सर्तक
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासन सर्तक झाले आहे. मुंबई आणि पुण्यातून कर्नाटककडे जाणारी वाहतुक थांबवण्याची सुचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोबतच खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची एक टीम कोल्हापूरकडे रवाना झाली आहे.;
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे दरवाजे संध्याकाळ पर्यंत उघडतील अशी माहिती कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. सोबतच कर्नाटक सरकारशी बोलणं सुरू असून, योग्य नियोजन सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितले ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साचलेल्या भागातील रुग्णालयातील रुग्ण इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कर्नाटककडे जाणारी वाहतूक थांबवली
मुंबई आणि पुण्यातून कर्नाटककडे जाणारी वाहतूक थांबवावी अशा सूचना देण्यात आली आहे. मात्र कोल्हापूरकडे येणाऱ्या नागरिकांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. मात्र, नागरिकांनी देखील मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन आहे त्या सुरक्षित ठिकाणी राहवं अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे परिस्थितीवर लक्ष
दरम्यान दोन वर्षांपुर्वीच्या महापुराच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यंदा आवश्यक ती खबरदारी घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चौकशी केल्याचे माहिती पाटील यांनी दिली. संपुर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. दरम्यान धोकादायक ठिकाणी खासगी बस घालणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाटील यांनी दिली.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 49 फुटांवर
मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 49 फुटांवर पोहचली आहे. पावसाची स्थिती अशीच राहीली तर पुढच्या काही वेळात पाणी पातळी 50 फुटांवर पोहचेल अशा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ ची एक टिम कोल्हापूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 ठिकाणी हेलिपॅड देखील तयार करण्यात आले आहेत अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.