चिपळूण तालुका जलमय ; एनडीआरएफची टीम दाखल
heavy rain in chilun ndrf team starts rescue operation
चिपळूण // चिपळूण तालुक्याला काल रात्रीपासून पावसाने चांगलेच झोडपले. तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने चिपळूण अक्षरश: जलमय झाले आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झालेत. शहारातील रस्ते जलमय झाल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय.\
शेकडो घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी
रात्रभर झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून 2005 ची पुनरावृत्ती होते की काय? अशी भीती चिपळूणधील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. चिपळूण शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. चिपळूण शहरातील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
एनडीआरएफची टीम दाखल
दरम्यान पुरपरस्थिती निर्माण झाल्याने एनडीआरएफची एक तुकडी पुण्याहून चिपळुणामध्ये दाखल झाली आहे. एनडीआरएफने मदतकार्य सुरू केल असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरूवात केली आहे.