अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी चौकशी अहवाल आठ दिवसाच्या आत सादर करा- आरोग्यमंत्री

Update: 2021-11-08 03:17 GMT

अहमदनगर : अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी अति दक्षता विभागात आग लागली होती त्या घटनेत 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास, होरपळणे,भाजणे यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली, यावेळी अनेक प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना होऊ नये त्यासाठी राज्यस्तरावर सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. विशेषत: कोरोनाच्या काळात अशा घटना समोर आल्यात, याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. यातून बोध घेत प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र फायर सेफ्टी ऑफिसर अशी चर्चा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झाली असल्याचे टोपे यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये राज्यातील या सर्व रुग्णालयांमध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय कामांसाठी सुरक्षा यंत्रणा उभारणीसाठी 17 कोटी रुपयांची रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील इमारती या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूर्ण होत असतात ते सांगताना एकंदरीत अहमदनगरच्या घटनेमध्ये झालेल्या दुर्घटनेला कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभाग दोषी आहे का? याबद्दल राजेश टोपे यांनी एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बांधकाम तांत्रिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक आणि यासाठी विविध लागणार निधी यावर भर दिला असून या प्रकारच्या दुर्दैवी घटना यापुढे होऊ नये यासाठी पूर्णपणे राज्य सरकार लक्ष देईल त्यावर उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

अहमदनगर घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले असून शासन पूर्णपणे या सर्व दुर्घटनेची चौकशी करून येत्या आठ दिवसांत संपूर्ण अहवाल मागून घेणार आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना तातडीने मदतीचे चेक देण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, त्यानुसार प्रातिनिधिक स्वरूपात काही नातेवाईकांना चेक देण्यात आले. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यकाळात अशा घटना वारंवार घडत आहेत, तसेच त्यांच्यावर अनेक आरोप होत असताना देखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही या प्रश्नाला उत्तर देताना, चौकशी अहवालात जो कुणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

Tags:    

Similar News