आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला असं समजून कामाला लागा- मुश्रीफ

Update: 2021-08-30 07:30 GMT

कोल्हापूर :राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असलं तरी , आघाडीतील तिन्ही पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसने खूप आधीपासूनच स्वबळावर बोलायला सुरुवात केली. त्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील केवळ मुंबईवरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा फडकविण्याचे म्हटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळाची भाषा सुरू केली आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वबळाचा नारा देणारं सूतोवाच केलं आहे.

आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला असं समजून कामाला लागा, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. कोल्हापुरात आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत मुश्रीफ बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांसह 10 विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत त्यांनी दिलेत. या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे सर्वांनाच पालन करावं लागतं, त्यानुसार सगळे नेते तयारीत आहेत असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या आधीच म्हटले होते. तसेच संघटनात्मक बाबींवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचेही पटोले म्हणाले.

त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून , नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत.

Tags:    

Similar News