औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही नवीन नाहीत. त्यातच आता जाधव यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून येणारी निवडणूक दानवेंच्या विरोधात लढवणार असल्याचा अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे.
हर्षवर्धन जाधव यांचा 18 जून रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आतापासूनच वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणारे होर्डिंग कार्यकर्त्यांकडून लावले जात आहे. त्याचाच भाग म्हणून जालना लोकसभा मतदारसंघात सुद्धा जाधव यांच्या काही कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देणारे होर्डिंग रस्त्याच्या कडेला लावले आहे.
यावरून जाधव यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत म्हंटलं आहे की, जालना लोकसभा मतदारसंघात माझ्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावण्यात आले असून, मी मनापासुन जालना लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे ऋण व्यक्त करतो.
तसेच जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या 20-25 वर्षांपासून जे दानवांच राज्य सुरू आहे,त्याच कुठंतरी अंत व्हावा अशी अपेक्षा होर्डिंग लावणाऱ्याची दिसतेय, त्यामुळे लोकांची जर इच्छा असेल तर निश्चितच येणाऱ्या काळात त्या पद्धतीने सकारात्मक विचार करण्याची माझी तयारी असल्याचं जाधव म्हणाले आहे.