एक भाकरी ऐवजी अर्धीच भाकरी; भरत गोगावलेंची खंत
आम्हाला एका भाकरीची अपेक्षा होती पण त्या ऐवजी अर्धीच भाकरी मिळाली. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भरत गोगावलेंनी आपली खंत मांडत पुढील भूमिकेचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
रायगड़:धम्मशील सावंत
राज्याच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद रायगडच्या राजकारणावर उमटले आहेत. रायगडात शिंदे गटाच्या आमदारांमध्येही अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.मंत्रिपदाचे गाजर दाखवून शिवसेनेतून शिंदे गटाला फोडण्यात आले. मात्र सरकारला एक वर्ष पूर्ण होऊनही मंत्री मंडळ विस्तार न झाल्यामुळे शिंदे गट अद्याप उपाशीच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार उघड उघड आपली नाराजी व्यक्त करत आहेत. आम्हाला एक भाकरी मिळणार होती, मात्र अर्धीच भाकरी मिळाल्याची खंत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आज माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे.
गोगावले म्हणाले की, “नाराज होऊन आता काय करणार? जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारून पुढे जावं लागेल. मात्र थोडीफार नाराजी राहणारच कारण ज्याला एक भाकरी खायची होती त्याला अर्धीच भाकरी मिळाली आणि ज्याला अर्धी भाकरी खायची होती त्याला पाव मिळाली. राजकारणाचं हे समीकरण स्वीकारून पुढे चालावं लागेल. मी अर्ध्या भाकरीत खुश आहे. आता मुख्यमंत्री जे निर्णय घेतील त्याला सहकार्य करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील.”
“खरंतर मंत्री पदाच्या वाटपात मी एक नंबरला होतो, पहिल्या 9 मंत्र्यांमध्ये माझं नाव होतं. पण काही कारणास्तव मला थांबवण्यात आलं, पण अजूनही मी थांबलेलोच आहे. आता मी थांबणार नाही, कारण 8 दिवसांमध्ये होणाऱ्या मंत्री मंडळ विस्तारात माझं नाव असेल अशी मला अपेक्षा आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं.” असे मत गोगावलेंनी व्यक्त केले.