देशाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात गुजरात पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्राचा क्रमांक किती?

Update: 2022-03-25 14:58 GMT

नवी दिल्ली: निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१' अहवालात ७७.१४ गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे. तर गुजरातने सलग दुसऱ्यांदा आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, निती आयोगाने आज 'निर्यात सज्जता निर्देशांक-२०२१' (Export Preparedness Index) (दुसरी आवृत्ती) जाहीर केला.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव बी.व्ही.आर. सुब्रमन्यम यांच्या उपस्थितीत हा निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

काय आहे निर्यातविषयक सज्जता निर्देशांक?

हा अहवाल म्हणजे भारताच्या निर्यातविषयक कामगिरीचे समावेशक विश्लेषण आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांच्या सहकारी राज्यांच्या तुलनेत स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि उपराष्ट्रीय स्तरावरील निर्यातीवर आधारित विकासाला चालना देण्यासाठी उत्तम धोरणात्मक यंत्रणा विकसित करण्याच्या संभाव्य आव्हानांचे विश्लेषण करणे यासाठी या निर्देशांकाचा वापर करता येईल.

निर्यातविषयक सज्जता निर्देशांक पुढील चार मुख्य मुख्य घटकांच्या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची क्रमवारी निश्चित करतो – धोरण, व्यवसाय परिसंस्था, निर्यात परिसंस्था आणि निर्यातविषयक कामगिरी. तसेच या क्रमवारीसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण, संस्थात्मक चौकट, व्यवसायाचे वातावरण, पायाभूत सुविधा, वाहतुकीची सुविधा, अर्थसहाय्य मिळण्याची सोय, निर्यातविषयक पायाभूत सुविधा, व्यापारविषयक मदत, संशोधन आणि विकासविषयक पायाभूत सुविधा, निर्यातीचे वैविध्यीकरण आणि विकासाभिमुखता हा 11 उपघटकदेखील विचारात घेतले जातात.

तीन प्रमुख मानकात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर...

दोन उपमानकात राज्याचा पहिला क्रमांक

या अहवालात एकूण ४ प्रमुख मानके आणि ११ उपमानकांच्या आधारावर देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्यात क्षेत्रातील प्रगती मांडण्यात आली आहे. चार पैकी तीन प्रमुख मानकांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून पायाभूत सुविधा आणि निर्यात प्रोत्साहन धोरण या उपमानकात राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

धोरणात्मक मानकांमध्ये ८२.४७ गुण, व्यापार परिसंस्था (इकोसिस्टीम) ८६.४२ आणि निर्यात परिसंस्था मानकात ८१.२७ गुण मिळवत महाराष्ट्र या तिन्ही प्रमुख मानकात देशात दुसऱ्या स्थानावर राहिले आहे.

यासोबतच निर्यात कामगिरी या प्रमुख मानकामध्ये ४९.३७ गुणांसह राज्य देशात तिसऱ्या स्थानावर राहिले आहे. उपमानकांमध्येही महाराष्ट्राची उत्तम कामगिरी राहिली आहे. यातील,'पायाभूत सुविधा' आणि 'निर्यात प्रोत्साहन धोारण' या दोन उपमानकात १०० गुण मिळवत राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 'आर्थिक सुलभता' आणि 'वाहतूक उपलब्धते'तही महाराष्ट्राने देशातील अग्रगण्य राज्यांमध्ये स्थान मिळविले आहे.

या सोबतच व्यापार पोषक वातावरण, संस्थात्मक संरचना, निर्यातविषयक पायाभूत सुविधा, व्यापार सहाय्य,संशोधन व विकासात्मक पायाभूत सुविधा, वृध्दी व अभिमुखता, निर्यात विविधीकरण अशा उपमानकातही महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे या अहवालात नमूद आहे.

चार प्रमुख व ११ उपमानकांच्या आधारे महाराष्ट्राला ७७.१४ गुणांसह या निर्देशांकात दुसरा क्रमांक मिळाला आहे. ७८.८६ गुणांसह गुजरात पहिल्या स्थानावर आहे. यापूर्वी 'निर्यात सज्जता निर्देशांक-२०२०' (प्रथम आवृत्ती) मध्येही महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकाविला होता. बहुतांश तटवर्ती राज्यांनी निर्यात क्षेत्रात उत्तम कामगिरी केली असून गुजरात राज्याने सर्वात उत्तम कामगिरी केली आहे असे या आवृत्तीमधून दिसून येते.

निर्यातविषयक सज्जता निर्देशांक 2021 अहवालात भारताच्या निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यातील तीन प्रमुख आव्हाने स्पष्ट झाली आहेत. ती म्हणजे- निर्यातविषयक पायाभूत सुविधांमध्ये राज्याराज्यांमध्ये आणि राज्यांतर्गत प्रादेशिक तफावती; राज्यांच्या दरम्यान व्यापाराला दुर्बल पाठींबा आणि व्यवसायाभिमुखता; आणि गुंतागुंतीच्या आणि अभिनव उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेल्या संशोधन आणि विकासविषयक पायाभूत सुविधांचा अभाव.

देऊन भारताला जागतिक निर्यात बाजारात अधिक उच्च स्थानी नेऊन ठेवण्याच्या उद्देशाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या दरम्यान निरोगी स्पर्धेला प्रोत्साहन देण्याकरिता हा निर्देशांक म्हणजे सरकार आणि धोरणकर्ते यांच्यासाठी मौल्यवान साधन ठरू शकते.

Tags:    

Similar News