नांदगाव येथे आयोजित आढावा बैठकीत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपत्कालीन निधीतून मदत देण्याच्या विषयावरून आढावा बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते मात्र ते उपस्थित नसल्याने कांदे आक्रमक पावित्रा घेतला
राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीवेळी नांदगाव शहर आणि परिसरास मुसळधार पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे शेतीसह शहरातील निवासी वस्ती, बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले. याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी बंधारे फुटले, अनेक रस्ते खचले, वाहून गेले. या नुकसान भरपाईसाठी कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर नांदगावातील पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी कांदे यांनी केली. दरम्यान पालकमंत्री भुजबळ यांनी कांदे यांना शांत राहण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं.सोबतच निधी मंजूर करण्यास काही मर्यादा असतात. अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते, असं भुजबळ यांनी सांगितले, दरम्यान यानंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले, उपस्थित कांदे समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. भुजबळ हे जनतेची दिशाभूल करत असल्याचे म्हणत जिल्हाधिकारी बैठकीस अनुपस्थित राहिल्याची तक्रार कांदे यांनी केली.
अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.
दरम्यान नांदगाव मतदारसंघ आधी राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. पंकज भुजबळ हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यातून हा मतदारसंघ सशिवसेनेचे कांदे यांनी खेचला होता.त्यामुळे या खडाजंगीला राजकिय किनार असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.