जुलै २०२१ मध्ये जीएसटी संकलन १ लाख कोटींच्या वर, जीएसटी संकलनात महाराष्ट्र नेहमीप्रमाणे अव्वल

जुलै २०२१ मध्ये जीएसटी संकलनात वाढ झाली असुन केंद्र सरकारच्या तिजोरीत १ लाख १६ हजार ३९३ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याने देशात सर्वाधिक १८,८९९ कोटी इतका भरघोस जीएसटी गोळा केला आहे.;

Update: 2021-08-01 10:54 GMT

सातत्याने ८ महिने देशाचं जीएसटी संकलन एक लाख कोटींच्या वर जमा होत होतं. मात्र जुन २०२१ मध्ये जीएसटीचं कलेक्शन १ लाख कोटींच्या खाली जमा झालं. परंतू जुलै २०२१ मध्ये पुन्हा एकदा जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. जुलै २०२१ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीत १ लाख १६ हजार ३९३ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. यात राज्यांची कर रक्कम २८ हजार ५४१ कोटी आणि केंद्राचा वाटा २२ हजार १९७ कोटी आहे. तर एकीकृत जीएसटी ५७ हजार ८६४ कोटी आहे. एकीकृत जीएसटीत २७ हजार ९०० कोटी आयातीच्या माध्यमातून आले आहेत. तर उपकर ७ हजार ७९० कोटी जमा झाला आहे. ८१५ कोटी आयातीवरील उपकरातून मिळाले आहेत. जीएसटीची रक्कम १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान जीएसटीआर-३ बी च्या माध्यमातून जमा झाली आहे.

जुलै २०२० च्या तुलनेत ३३ टक्के अधिक कर जुलै २०२१ मध्ये जमा झाला आहे. जुलै २०२० मध्ये जीएसटी ८७ हजार ४२२ कोटी जमा झाला होता. त्यात केंद्राचा वाटा १६ हजार १४७ कोटी, तर राज्यांचा वाटा २१ हजार ४१८ कोटी होता. तर एकीकृत जीएसटी ४२ हजार ५९२ कोटी रुपये इतका होता. जुलै २०२० पेक्षा जुलै २०२१ मध्ये, मालाच्या आयातीतून उत्पन्न 36% जास्त होते आणि घरगुती व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) झालेल्या उत्पन्नापेक्षा 32% जास्त आहे.

जुन २०२१ महिन्यात जीएसटी ९२ हजार ८४९ कोटी जमा झाला होता. त्यात केंद्राचा वाटा १६ हजार ४२४ कोटी, राज्याचा वाटा २० हजार ३९७ कोटी आणि आयजीएसटी ४९ हजार ७९ कोटी इतका होता. करोनाची दुसरी लाट आणि लॉकडाउन यामुळे जून महिन्यात जीएसटी संकलनात घट झाल्याचं समोर आलं आहे. मात्र जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा जीएसटीत वाढ होताना दिसत आहे.

जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल

सातत्याने कर संकलनात प्रथम असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने जुलै २०२१ मध्ये देखील सर्वाधिक १८,८९९ कोटी इतका भरघोस जीएसटी गोळा केला आहे. जुलै २०२० च्या तुलनेत जुलै २०२१ मध्ये राज्याच्या जीएसटी संकलनात ५१ टक्के वाढ झाली आहे. यावेळी तरी केंद्राकडून योग्य तो जीएसटी परतावा मिळणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

gst

 

Tags:    

Similar News