युवकांनी व्यसनापासून दूर रहावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Update: 2021-10-29 00:42 GMT

शासकीय निधी आणि योजनेचा योग्य वापर, ग्रामस्थांची साथ आणि लोकसहभागामुळेच हिवरे बाजार गावाचा कायापालट झाला असून , गावाने जगभर नावलौकिक मिळवला आहे. हा लौकिक टिकवतानाच तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज हिवरेबाजार येथे केले.

आदर्श गांव हिवरेबाजार येथील विविध उपक्रमांना राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी राज्यपालांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे, उपवनसंरक्षक सुवर्णा माने याप्रसंगी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की , शिकण्याचे कोणतेही वय नसते त्यामुळे येथील ग्राम विकासाची कामे पाहून मलाही शिकायला मिळाले. गावकऱ्यांनी मेहनतीने एकजुटीने काम केले म्हणूनच हिवरेबाजार आदर्श गाव झाले. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्हयात अजून आदर्श ग्राम विकसित करावेत अशी सूचना त्यांनी केली. यावेळी राज्यपालांनी हिवरेबाजार शाळेला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी प्रास्ताविकात गावामध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गावाजवळील टेकडीवर करण्यात आलेल्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:    

Similar News