#VodafoneIdea : व्होडाफोन आयडियामध्ये सरकार सगळ्यात मोठा भागीदार, BSNLचे काय होणार?
एकीकडे देशात केंद्र सरकारने तोट्यातील उद्योग विक्रीचा सपाटा सावलेला असताना आता एक वेगळा निर्णय घेतला आहे. Vodafone Idea कंपनीचे स्पेक्ट्रम लिलावाचे थकीत हप्ते आणि व्याजाची संपूर्ण रक्कम इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याला मान्यता देण्यात आली आहे. कंपनीच्या बोर्ड मिटींगमध्ये ही मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर Vodafone Idea कंपनीत केंद्र सरकारची मोठी भागीदारी तयार होणार आहे. पण यामुळे कंपनीचे प्रवर्तक आणि सध्याचे सर्व शेअर होल्डर्स यांना त्यांचा स्टेक कमी करावा लागणार आहे. या व्यवहारामुळे केंद्र सरकारकडे कंपनीच्या एकूण थकबाकीपैकी जवळपास ३५ टक्के शेअर्स असतील. त्याचबरोबर Vodafone ग्रुपकडे २८.५ तसेच आदित्य बिर्ला ग्रुपकडे १७.८ टक्के शेअर्स असतील.
पण या निर्णयानंतर विविध आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. या निर्णयाचे शेअर बाजारात अजिबात स्वागत झालेले नाही. या वृत्तानंतर Vodafone Ideaचे शेअर्स मंगळवारी सकाळी २ टक्क्यांनी घसरले.
या घडामोडींनंतर सोशल मीडियावर आर्थिक संकटात असलेल्या BSNLच्या भवितव्याबाबतही मिम्स व्हायरल झाले आहेत. एकीकडे सरकार BSNLचे खासगीकरण करणार का अशी चर्चा असताना आता सरकारनेच Vodafone Ideaमध्ये आपली भागीदारी केल्याने BSNLचे त्यात विलिनीकरण होणार का अशीही चर्चा सुरू झाली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात एका तज्ज्ञाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार BSNL आणि MTNLच्या पायाभूत सुविधांचा फायदा Vodafone Ideaला होऊ शकतो. तर टेलिकॉम टॉकने दिलेल्या वृत्तानुसार BSNL संकटात आहे, त्यामुळे सरकार एअर इंडियाप्रमाणे BSNLबाबत निर्णय़ घेऊ शकते. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांच्या स्पर्धेत मागे पडलेल्या Vodafone Idea ला स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज होती, ती त्यांनी या रुपाने मिळवली आहे, त्यामुळे Vodafone Idea आणि BSNLचे विलीनीकरण करुन सरकार त्याची विक्री करु शकते, अशी शक्यता आहे.