जळगाव : आज गोर सेना व बंजारा समाज बांधव विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आंदोलनावेळी आक्रमक झाले. जामनेर तालुक्यातील पहूर गावात गोर सेनेच्यावतीने मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जळगाव छत्रपती संभाजीनगर व भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावर रास्ता रोको केले. यामध्ये काहीजणांकडून वाहनांचे नुकसान देखील करण्यात आले.
गोर सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या पहूर येथील आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाजातील लहान बालकांपासून ते ज्येष्ठापर्यंत सहभागी झाले होते. घोषणाबाजी करीत आंदोलक पुढे-पुढे जात होते. या आंदोलनाला काहीसे हिंसक वळण देखील लागल्याचे पाहायला मिळाले. संतप्त झालेले काही आंदोलकांनी भाजपाचे चिन्ह असलेल्या गाड्यांचा काचा फोडल्या. यामुळे आंदोलन स्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तब्बल अडीच ते तीन तास महामार्ग आंदोलकांनी जाम केल्याने छत्रपती संभाजीनगर जळगाव व बऱ्हाणपूरकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. दरम्यान आंदोलकांची भूमिका लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी मागविण्यात आला, त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून परीस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.