आगामी लोकसभा निवडणूकीवरून राजकारण चांगलचं तापलं आहे. काँग्रसे, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट अशी महाविकास आघाडीत लोकसभेसाठी फॉर्म्युला ठरणार आहे तर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती असणार आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत लोकसभा निवडणूकीत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमिवर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले आहे.
दरम्यान मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "राज्यात महायुती भक्कम झाली असून, उद्धव ठाकरे गटाने एक तरी जागा निवडून आणून दाखवावी", असे आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यातून ते बोलत होते. "मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे हे आपले एकच लक्ष्य आहे. लोकसभेसाठी ४०५ चा नारा दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्रातून एक तरी जागा निवडून आणून दाखवावी. सकाळपासून काहीही बोलले तरी ते लोकांना आवडत नाही. महायुती म्हणून पुढील काळात अधिक सतर्क राहावे लागणार आहे. नेते, कार्यकर्त्यांच्या अडचणी, व्यथा प्रत्येक मतदारसंघात कमी-जास्त प्रमाणात आहेत. एकत्र लढलो तर समोर कुणीच दिसणा नाही, असेही यावेळी महाजन म्हणाले