कोरोना काळात गौतम अदानी दररोज कमवतायेत 1 हजार कोटी...

कोरोना काळात गौतम अदानी दररोज कमवत होते 1 हजार कोटी... Gautam Adani now Asia's second richest, earns Rs 1,000 crore daily

Update: 2021-10-01 13:06 GMT

कोरोना महामारीच्या काळात देशात आणि जगात गेल्या दीड वर्षांपासून तीव्र आर्थिक मंदी सुरु आहे. मात्र, या मंदीचा कोणताही परिणाम कोट्याधीश उद्योजक गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या उद्योग व्यवसायावर पडलेला नाही.

विशेषत: गौतम अदानीची संपत्ती गेल्या एका वर्षात रॉकेटच्या वेगाने वाढली आहे. एवढंच नव्हे तर, गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी देखील आशियातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीमध्ये आले आहेत.

दरम्यान, वाढती संपत्ती आणि रोजच्या कमाईच्या बाबतीत त्यांनी इतर उद्योगपतींना कितीतरी मैल मागे सोडलं आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एका वर्षात साधारण साडेतीन पटींनी वाढली आहे.

एवढंच नव्हे तर, रोजच्या कमाईच्या बाबतीत तर त्यांनी मुकेश अंबानींना देखील मागे टाकलं आहे. दरम्यान, अदानी दोन स्थानांनी वर चढून आशियातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 नुसार, मुकेश अंबानींच्या गेल्या एक वर्षात रोजच्या कमाईचा आकडा 163 कोटी रुपये होता. तर या काळात गौतम अदानी रोज 1002 कोटी रुपये कमवत होते. एवढेच नाही तर 5,05,900 कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह, गौतम अदानी समूह आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये दोन स्थानांनी वर चढत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अदानी समूहाचे एकत्रित बाजार भांडवल 9 लाख कोटी रुपये आहे. तर, अदानी समूहाच्या अदानी पॉवर वगळता सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे मूल्य 1 लाख कोटींपेक्षाही जास्त आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यापारी आहेत. तर अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यापारी बनले आहेत. सध्या गौतम अदानींची एकूण मालमत्ता 5,05,900 कोटी रुपये असून, मुकेश अंबानी यांची संपत्ती सुमारे 7.18 लाख कोटी रुपये आहे.

दरम्यान, अदानीच्या शेअरच्या किंमती गेल्या काही काळापासून वाढू लागल्या आहेत. अदानींनी आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोंग शानशानला मागे टाकलं आहे. मात्र, गौतम अदानी आणि त्याचा दुबईस्थित भाऊ विनोद अदानी या दोघांनी आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अगोदर, त्यांचा भाऊ आशियातील 12 वा श्रीमंत व्यापारी होता. जो आता ८ व्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे.

रिपोर्टनुसार, विनोद अदानी यांची संपत्ती 1.31 लाख कोटी रुपये आहे. त्याची संपत्ती एका वर्षात 21% वाढली आहे. तर, आयटी कंपनी एचसीएल टेकचे शिव नादर आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती एका वर्षात 67% वाढली आहे. त्यांची एकूण संपत्ती 2.36 लाख कोटी रुपये आहे. मात्र, त्याची रँकिंग गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. ते तिसऱ्या क्रमांकावरच आहेत. दरम्यान, SP हिंदुजा कुटुंबाची संपत्ती 2.30 लाख कोटी रुपये आहे. त्याच्या संपत्तीत 53% वाढ झाली आहे.

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 चे एमडी आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की, गौतम अदानी एकमेव भारतीय आहेत ज्यांनी एक नाही, तर एक लाख कोटी रुपयांच्या पाच कंपन्या निर्माण केल्या आहेत. याव्यतिरिक्त, एचसीएलचे शिव नादर यांच्या एचसीएल लिमिटेड कंपनीने तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. यासह त्यांची मालमत्ता 2,36,600 कोटी रुपयांवर गेली आहे.

आयआयएफएलच्या यादीनुसार, भारतात 1000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारे १००० हुन अधिक लोक आहेत. हुरुन इंडियाने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 नुसार, 119 शहरांमधील 1,007 व्यक्तींची संपत्ती 1000 कोटी रुपये आहे.

या यादीनुसार, गौतम अदानींची मालमत्ता एक वर्षापूर्वी 1,40,200 कोटी रुपये होती, जी आता 5,05,900 कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच केवळ एका वर्षात त्याची संपत्ती साडेतीन पटींनी वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी यावर्षी IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांची एकूण मालमत्ता एका वर्षात सुमारे 9 टक्क्यांनी वाढली आहे.

अलीकडेच अदानी समूहाने क्लीन एनर्जी संबंधित तंत्रज्ञानावर पुढील 10 वर्षात $ 20 अब्ज (1.47 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही गुंतवणूक उपकरणे उत्पादन युनिट आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केली जाईल अशी घोषणा केली आहे.

Tags:    

Similar News