कस्तुरबा रूग्णालयात गॅस गळती ; महापौर किशोरी पेडणेकर यांची रूग्णालयाकडे धाव
दक्षिण मुंबईतील महत्वाचे असलेल्या कस्तुरबा रूग्णालयात गॅस गळतीची घटना घडली आहे. गॅस गळतीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.;
मुंबई :दक्षिण मुंबईतील महत्वाचे असलेल्या कस्तुरबा रूग्णालयात गॅस गळतीची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. LPG गॅस लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 3 वॉटर टँकरला पाचारण करण्यात आलं.
गॅस गळतीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ई बसेस लोकार्पण सोहळा सोडून, रुग्णालयाकडे धाव घेतली.
LPG गॅस पाईपलाईन लीक झाल्याने तातडीने रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्यात आलं. ही गॅसगळती छोट्या प्रमाणात असल्याने मोठा अर्नथ टळला आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास गॅस गळती झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
गॅस गळतीनंतर परिसरात गॅसचा वास येत होता. संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. कोणताही विलंब न लावता तातडीने अग्निशमन दलाने रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान ही गॅस गळती कशामुळे झाली याची माहिती घेतली जात असून त्यावर तातडीने उपाययोजना केली जात असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.