'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
अलिया भट्टची प्रमुख भुमिका असलेला चित्रपट गंगूबाई काठियावाडी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तर या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.;
संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाविरोधात काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या चित्रपटात अलिया भट्टने एक वेश्या ते माफिया क्वीन बनलेल्या गंगूबाई काठियावाडी हीचा प्रवास साकारला आहे. तर गंगुबाई काठियावाडी या कामाठीपुऱ्यातील लाल बत्ती भागात वेश्याव्यवसाय करत होत्या. मात्र या चित्रपटामुळे संपुर्ण कामाठीपुरा बदनाम होईल, असे सांगत या चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
काँग्रेस आमदार अमीन पटेल म्हणाले की, या चित्रपटात काठियावाड नाव आहे. त्यामुळे शहराची बदनामी होत आहे. तर कामाठीपुरा हा मोठा परिसर आहे. या परिसरात एक ते दोन गल्लीत वेश्याव्यवसाय चालतो. त्यामुळे संपुर्ण परिसर बदनाम होत आहे. म्हणून या चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे, अशी जनहित याचिका आमदार अमीन पटेल यांनी केली आहे.
अलिया भट्ट मुख्य भुमिकेत असलेल्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाविरोधात गंगूबाई काठियावाडी यांचे पुत्र बाबु रावजी शाह यांनी या चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर त्यामध्ये या चित्रपटामुळे त्यांची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्याला परवानगी दिल्यानंतर आता काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे.
संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर लवकर सुनावणी अपेक्षित आहे.