कलेक्टरलाच विचारलं "भाऊ, तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये क्लर्क आहात काय ?

Update: 2023-06-23 06:20 GMT

कडेकोट सुरक्षा, गाड्यांचा ताफा, आजूबाजूला अधिकारी-कर्मचारी यांचा घेरा अशा परिस्थितीत आयएएस अधिकारी वावरत असतात. त्यामुळं त्यांना ओळखणं सहज सोप्प असतं. मात्र, एक आयएएस अधिकारी स्विमिंग पुलवर पोहण्यासाठी गेले. ना सुरक्षा रक्षक ना लवाजमा...त्यामुळं एका मुलानं थेट त्या आयएएस अधिका-यालाच विचारलं की, “ भाऊ, तुम्ही कलेक्टर ऑफिसला क्लर्क आहात का ? तुम्हांला मी दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात पाहिलंय”. त्या मुलाच्या प्रश्नावर आयएएस अधिकाऱ्यानं दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

युपीएससी सारखी सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांना देशभरात महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या दिल्या जातात. त्यात जिल्हाधिकारी पद हे महत्त्वाचं मानलं जातं. संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतात. त्यामुळं त्यांचा चेहऱ्यानं का होईना पण पूर्ण जिल्ह्याला परिचय असतो, असा समज आहे. मात्र, हा समज पूर्णतः खरा असेलच असं नाही. याचा प्रत्यय गडचिरोलीत खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच आलाय.

गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले ओमकार पवार (IAS Omkar Pawar) हे सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे स्विमिंगला गेले होते. त्या ठिकाणी एक मुलानं त्यांना थेटच विचारलं, "भाऊ, तुम्ही कलेक्टर ऑफिसमधे क्लर्क आहात काय ? मी तुम्हाला 2 वेळा तिथे बघितले" या प्रश्नावर काय उत्तर द्यावं यावर क्षणाचाही विलंब न लावता ओमकार पवार यांनी अगदी आनंदानं ‘हो’ असं उत्तर त्या मुलाला दिलं.


यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलपाटे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांच्या या घटनेसंदर्भात संपर्क साधला. यावर ओमकार पवार म्हणाले, “गडचिरोली क्रीडा संकुलात १०० च्या आसपास दररोज मुलं येत असतात. त्यात मी जिल्हाधिकारी असल्याचं केव्हाही कोणाला सांगितले नाही. त्यांच्याशी रोज संवाद होतो. ज्या मुलाने मला प्रश्न केला, त्या मुलाला क्लर्कची परिक्षा द्यायची होती. त्याचा भाऊ हा गोंदिया येथे क्लर्क आहे. आणि त्याला क्लर्क व्हायच असल्याचं त्यानं सांगितलं. म्हणून त्याने मला "तुम्ही क्लर्क आहेत का ? तुम्हाला २ वेळा बघितलय" असा प्रश्न केला, यावर मी त्याला खरं न सांगता "हो" म्हटलं त्यानंतर बराच वेळ आम्ही दोघांनी चर्चा केली.

यावर त्यांना पत्रकार म्हणून पुढील प्रश्न विचारला सर तुमच्याशी बोलताना अगदी मित्रासोबत बोलल्यासारखं वाटतं त्यावर ते म्हणाले की, "प्रशासनाचे कामचं असते की, लोकांचे मित्र बनूण काम करणे". ते पूढे म्हणाले की सायकल चालणे, मुलांसोबत मैदानात क्रिकेट खेळणे आणि स्विमिंग करणे यातून माझा व्यायाम होतो आणि तेथील लोकांसोबत संवादही होत असल्याचं गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांनी सांगितलं.

याच पोस्टवर सध्या सोशल मीडीवर जोरदार चर्चा होत आहे अनेक सामान्य नागरिकांपासुन ते सनदी अधिकारी, माध्यम प्रतिनिधीनी त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

IRS अधिकारी असलेल्या Anil Khadse यांनी ही स्व:ताचा अनुभव शेअर करत म्हणाले की "माझ्याबाबतीतही खुपदा असं घडलं आहे.

यावर आशिष जाधव यांनी प्रतिक्रीया देत म्हणाले की, लोकांमध्ये वावरत असताना लोकांकडून "ही तुमच्या साधेपणाला मिळालेली पावती आहे. Remember त्याने आधी भाऊ म्हटलेलं आहे. असाच लोकांमधला वावर आणि अनुभव माणसाला मोठे करतो. Wish you a big career ahed as an IAS."

अॅड. निखील कांबळे आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले, "त्या मुलासोबत तुम्ही खूप नम्र आहात हे पाहून खूप आनंद झाला. ही सहानुभूती सदैव तुमच्यासोबत ठेवा. अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.





 


Tags:    

Similar News