पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी संकलन
महापूरामुळे कोकण , सांगली , कोल्हापूर या भागात फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निधी संकलीत केला जात आहे. यामध्ये शहरातील छोट्यातल्या छोट्या व्यापाऱ्याने मदत करत खारीचा वाटा उचलला आहे.;
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरामुळे कोकण , सांगली , कोल्हापूर या भागाला मोठा फटका बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी आणि वित्तहानी झाली आहे. या पूरग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीची गरज आहे. त्या अनुषंगाने भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निधी संकलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वरणगाव शहरामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करण्यात आले , शहरातील व्यापारी वर्गाकडून हा निधी जमा केला जात असून प्रत्येकाने या मदत निधीला हातभार लावण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे. पूराने बाधित झालेला प्रत्येक व्यक्ती आपला बांधव असून त्यांना जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी राजेंद्र चौधरी यांनी म्हटलं आहे. या मदत निधीमध्ये खारीचा वाटा उचलावा म्हणून शहरातील छोट्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी मदत केली आहे. खरतर पूरग्रस्तांची एवढी मोठी हानी झाली की ती कधीही भरून निघणार नाही मात्र, पूरबाधीत बांधवाना पुल न पुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत करत असल्याचं म्हणत, महाराष्ट्रातील कोणावरही अशी वेळ येऊ नये असं चौधरी यांनी म्हटलं आहे.