महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसींची फसवणूक- आमदार लांडगे

Update: 2021-09-15 13:47 GMT

पिंपरी चिंचवड  : ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. विविध माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून समाजाची केवळ दिशाभूल केली जात आहे. केवळ मतासाठी ओबीसी समाजाचा वापर केला जात आहे. आघाडीच्या या फसव्या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याची टीका भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या संदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आणि ओबीसी विरोधी भूमिकेचा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याच्या वतीने निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार लांडगे बोलत होते.

या वेळी महपौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा उमा खापरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, योगेश लोंढे उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, राज्य सरकारला केवळ निवडणुकीचे पडले आहे. ओबीसी समाजाचा मुद्दा लावून धरून महाविकास आघाडी सत्तेत आली. मात्र सत्ता आल्यानंतर ओबीसी सामजाला आरक्षणाच्या नावाखाली केवळ झुलविले जात आहे. हे आता खपुन घेतले जाणार नाही. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार लांडगे यांनी दिला.

यावेळी ओबीसी के सन्मान मे, भाजपा मैदान मे, आरक्षण आमच्या हक्‍काचे नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही, आदी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आ.महेश लांडगे, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, उमा खापरे, राजू दुर्गे, वीणा सोनवलकर व ऋषिकेश रासकर यांनी मार्गदर्शन केले.

Tags:    

Similar News