पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या वाहनांच्या मीटर मधील रीडिंगमध्ये फेरफार करून देण्याचा गोरखधंदा जोरदार सुरू असल्याचे म्हणत याबाबत वेळीच आणि तातडीने कारवाई न झाल्यास ग्राहकांची लूट होऊन स्क्रॅप झालेल्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसतील. आणि त्यातून होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात असेल. त्यामुळे वाहतूक पोलीस प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी माजी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.
याबाबत राहुल जाधव यांनी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सद्या नाशिक फाटा, कासारवाडी अशा ठिकाणी मेकॅनिक वाहनचालकाच्या मर्जीनुसार चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या मीटर रिडींगमध्ये असा बदल करून देत आहेत. यामुळे १५ वर्षांनंतरच्या गाड्या स्क्रॅपमध्ये जमा न होता रस्त्यावर धावताना दिसतील यामुळे प्रदूषणात नक्कीच वाढ होणार आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये अनेकदा प्रसिद्ध झाले आहे.
मीटरमध्ये फेरफार करून घेतलेल्या या वाहनांना विक्रीसाठी चांगली किंमत मिळत असल्याने दुचाकी व चारचाकी वाहन मालक गाडी विक्रीसाठी असे विविध फंडे शोधत आहेत. काही चारचाकींना ऑइल व मीटर रीडिंग पाहण्यासाठी ट्रीप ए आणि ट्रीप बी हे मॅन्युअली पर्याय आहेत. मात्र, त्याचा वापर किलोमीटर पाहण्यासाठी होत नसून फेरफार करण्यासाठी होत आहे. अशा चालकांवर प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.
भरारी पथक करुन कारवाई करा : जाधव
वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन डिजीटल स्पीडोमीटरच्या गाड्या बाजारात आल्या आहेत. परंतु, टेक्नॉलॉजी कितीही बदलली, तरीही टेक्निकल एक्स्पर्टही तितकेच आहेत. डिजीटल मीटर असलेल्या वाहनांचे थेट मीटर रीडिंग बदलले जात आहे. दुचाकी व चारचाकीचे मीटर रीडिंग बदलताना थेट शून्यावरही रीडिंग करून मिळते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत भरारी पथकाच्या माध्यमातून अथवा थेट कारवाईच्या माध्यमातून अशा गोरख धंद्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. अन्यथा यातून ग्राहकांची फसवणूक तर होणार आहेच. शिवाय शहराचे प्रदूषणही वाढणार आहे, याबाबत गांभीर्याने कारवाई मोहीम राबवावी, असेही राहुल जाधव यांनी म्हटले आहे.