राज्यात आणखी चार 'Omicron' बाधित आढळले ; आतापर्यंत ३२ जणांना संसर्ग!
राज्यात आज आणखी चार 'ओमिक्रॉन'बाधित आढळलेत. या चार 'ओमिक्रॉन'बाधित रुग्णांमध्ये उस्मानाबादमधील दोन जण, मुंबईमध्ये एक आणि बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे
मुंबई// राज्यात आज आणखी चार 'ओमिक्रॉन'बाधित आढळलेत. या चार 'ओमिक्रॉन'बाधित रुग्णांमध्ये उस्मानाबादमधील दोन जण, मुंबईमध्ये एक आणि बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या आता ३२ वर पोहचली आहे. आज आढळलेल्या चार रुग्णांमध्ये तीन पुरूष व एक महिला आहे.
आजपर्यंत आढळलेल्या ३२ ओमिक्रॉनबाधितांमध्ये मुंबई-१३, पिंपरी चिंचवड-१०, पुणे – २, उस्मानाबाद -२, कल्याण डोंबिवली -१, नागपूर-१, लातूर-१,वसई विरार -१ आणि बुलडाणा -१ अशी रूग्णसंख्या आहे. दरम्यान यापैकी २५ जणांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून सुट्टी देखील देण्यात आली आहे.
तर, राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट जरी ओसरली असली, तरी देखील आता ओमिक्रॉनरुपी नवं संकट राज्यावर घोंगावत आहे. कारण, जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला आढळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी मंत्रीमंडळ बैठकीत दिली आहे.
ओमिक्रोनचा संसर्ग जगामध्ये झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात देखील रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण केवळ मोठ्या शहरात नसून लहान शहरांतही आढळून येत आहेत. पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात ओमिक्रोनचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आढळेल", असे अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे . तर, लसीचे दोन डोस सर्वांना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.