जळगावमधील घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे खान्देशच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.
माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई हायकोर्टाने कायम स्वरूपी जामीन मंजूर केला आहे. जळगावमधील २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्यात जैन यांना १० मार्च २०१२ साली अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर हा खटला सुनावणीला असताना जैन हे तब्बल साडेचार वर्षे धुळे येथील तुरुंगात होते. यादरम्यान, २ सप्टेंबर २०१६ मध्ये जैन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र त्यात मुंबई येथेच थांबण्याची अट घालण्यात आली होती. मुंबई वगळता कुठेही परदेश दौरा अथवा कुठेही न जाण्याची अट न्यायालयाने ठेवली होती. त्यामुळे जैन यांना जळगावात येण्यास मज्जाव घालण्यात आला होता. याविरोधात जैन यांनी मुंबई हाय कोर्टात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन जैन यांना कोर्टाने आज नियमित जामीन मंजूर केला आहे. जैन यांच्यावतीने Adv.आबाद पोंडा यांनी न्यायालयीन बाजू मांडली.
जैन यांच्या एंट्रीने राजकारणात होणार बदल
गेली अनेक वर्षे राजकीय विजनवासात असलेल्या सुरेश जैन यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्याने आता जळगाव जिल्ह्यातील राजकारणात बऱ्याच उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरकुल घोटाळा प्रकरण सुरू असतांना सुरेश जैन शिवसेनेत होते. आता शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. फूट पडल्यानंतर सुरेश जैन यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरें ) यांच्या बॅनर वर सुरेश जैन यांचे फोटो लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(बाळासाहेबांची शिवसेनेच्या) बॅनर्स वर मात्र सुरेश जैन फोटो दिसले नव्हते. गेले अनेक वर्षे सुरेश जैन राजकारणाच्या विजनवासात होते. त्यामुळे सुरेश जैन उद्धव ठाकरेंबरोबर की इतर कोणत्या पक्षात हे जैन जळगावात आल्यावर समजणार आहे.
जैन यांचे खंदे समर्थक शिंदे गटात
सुरेश जैन घरकुल प्रकरणी कारागृहात होते. तसेच त्यांना जामीन मिळल्यानंतर काही वर्षे जैन राजकारणाच्या बाहेर होते. याच काळात राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडल्या. जैन यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. तर जैन यांचे एकेकाळी खंदे समर्थक असलेले मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील , किशोर पाटील , चंद्रकांत पाटील ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले. जैन यांचे अगोदर पासूनच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. घरकुल प्रकरणी एकीकडे भाजप नेते एकनाथ खडसे हे जैन यांना अटकेसाठी पूर्ण ताकद लावली तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी जैन यांना वाचवण्यासाठी मदत होती हे सर्वसृत आहे.
येणाऱ्या निवडणुकीत जैन फॅक्टर चालणार ?
आता जैन जळगावच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री करणार असतील तर जिल्ह्याचे राजकारणात अनेक उलथापालथी होतील यात शंका नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जैन सक्रिय झाले. भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाला फटका बसेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात आहे. तसेच पुढच्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही प्रभाव दिसून येईल. सुरेश जैन किती सक्रिय होतील यावरच पुढचं राजकारण अवलंबूल असणार आहे.