मुंबईकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पालिकेत शिवसेनेचा सुद्धा विरोध करू : विरोधीपक्ष नेते रवी राजा

महाविकास आघाडीमधे कॉंग्रेस शिवसेना खटके उडत असताना आता मुंबई महानगरपालिकेतही कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीनं शिवसेनेला टार्गेट केले आहे. मुंबईकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पालिकेत शिवसेनेचा सुद्धा विरोध करू असे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.;

Update: 2020-12-29 14:43 GMT

करोनाकाळात केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित करावी, या बैठकीत पालिका आयुक्तांनी उपस्थित राहावे, करोनाकाळात केलेल्या कामांची पालिकेच्या लेखापरीक्षक विभागामार्फत चौकशी करावी या संदर्भात स्थायी समितीची उपसमिती स्थापन करावी, अशी मागणी करीत समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी प्रशासनावर टीका केली. विरोधी पक्षनेते रवी राजा आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. करोनाविषयक कामांचे सर्व प्रस्ताव तपशीलवार माहितीसह सादर करावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

यासगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधीपक्ष नेते रवी राजा,राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेच्या गटनेत्या राखी जाधव आणि समाजवादी पक्षाचे पालिकेचे गटनेते रईस शेख यांनी एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे आहे. रवी राजा यांनी पत्रकार परिषदेची सुरवात करत शिवसेनेवर हल्ला चढवत आरोप केला की,भ्रष्टाचाराला खतपाणी सत्ताधारी घालत आहे म्हणून त्यानंतर त्यांनी हॉटेल ताज च्या समोरच्या फुटपाथ चा विषय घेत त्यांनी प्रशासनावर टीका केली. हॉटेल ताज च्या समोरचा रस्ता आणि फुटपाथ दोन्ही सुरक्षेच्या कारणास्तव अतिक्रमण केले आहे.या विषयावर एका व्यक्तीने लोकायुक्त कडे याबाबत तक्रार केली.

यावर लोकायुक्तांनी दिलेल्या निर्णयवर पालिकेने रस्त्याबाबत कुठलीही पॉलिसी तयार केली नाही. पालिकेने रस्त्याचे ८.५० कोटी माफ करण्याचे म्हटले आहे. तर फुटपाथ चे १.५० कोटी पैकी ५० % रक्कम भरण्याचे प्रस्तावित केले आहे त्यावर आमचा थेट आरोप आहे की पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ताज हॉटेल ला झुकते माप दिले आहे.कोविड च्या काळात पालिकेने आत्ता पर्यंत १३०० कोटी खर्च केले आहेत. त्यापेक्षा जास्त ४०० कोटीचा खर्च झाला आहे. आणि अजून ४५० कोटी रुपये मार्च पर्यंत खर्च होणार आहेत अस सांगितले जात आहे आणि २५१ कोटी रुपये फक्त कोविड सेंटर वर खर्च झाले आहे. ते कंत्राट कुणाला आणि कसे दिले गेले आहेत हे आम्हांला माहिती आहे.सत्ताधाऱ्यांचं पालिकेवर वचक नाही.

पालिकेचे वरिष्ठ अधिकारी ताज मेंबरचे सदस्य आहेत म्हणून ताज हॉटेलला हे कर माफ केल जात आहे मुंबई महानगरपालिकेचे काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांचा आरोप केला. ताजला सूट आणि मुंबईकराकडून मात्र मालमत्ता कर वसूल करणार , ही दुट्टपी भूमिका आहे पालिकेची. मुंबई महापालिकेत अजून महाविकास आघाडी झालेली नाही आहे , त्यामुळे आम्ही सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार आणि लोकांचे प्रश्न आम्ही उपस्थित करणार. मुंबई महापालिकामध्ये भाजप आपल्या फायद्यासाठी काम करत आहे.राज्य सरकार मध्ये भाजपला रोखण्यासाठी आम्ही सोबत गेलो पण पालिकेत आम्ही लोकांचं प्रश्न मांडणार असे पत्रकार परिषदेत रवी राजा यांनी आपली भूमिका मांडली.

ही पत्रकार परिषद खरी तर खूप महत्त्वाची ठरली कारण राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पक्ष मुंबई महंगारपालिके मध्ये एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिले आहेत आणि त्यात पालिकेत शिवसेना आपल्या मनाचा कारभार करत आहे असा आरोप विरोधकांनी लावला आहे यावर समाजवादी पक्षाचे पालिकेचे गटनेते रईस शेख यांनी पालिका प्रशासनावर टीका केली आणि पालिकेच्या आयुक्तांनावर खरमरीत टीका केली त्यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना सांगितले की,सत्ताधारी हे मोठ्या लोकांचे एजंट म्हणून काम करत आहेत.मुंबईकरांना सुधारित मालमत्ता कराची पावती दिली जाणार आहे , सेनेनं ही घोषणा होती आता सेना म्हणत आहे की सर्व मालमत्ता कर माफ करणार नाही आहे असं म्हणत आहे.

आता ताज हॉटेलला सवलत देण्याचा विचार शिवसेना आणि प्रशासन करत आहेत पण का करावा एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का द्यावा? मुंबईतील कोविड सेंटर हे व्यवसाय झाला आहे , आता मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी आहेत तरी पण सर्व कंत्राटदारांना पैसे दिले जात आहेत या सर्व गोष्टीला आमचा विरोध आहे , आणि चौकशी ही झालीच पाहिजे.आयुक्त हे नेहमी वर्षा बंगल्यावर असतात मग त्यांना तिथे मुंबई महानगरपालिकेच कार्यालय बांधून द्या तिथून मुंबईच काम चालेल अशी खरमरीत टीका रईस शेख यांनी पालिका आयुक्तांवर केली.

पालिकेचे अधिकाऱ्यांनी या कोरोनाच्या काळात दिलेल्या गेलेल्या विशेष अधिकारांचा गैरवापर करत पालिकेच्या कामात आर्थिक अनियमितता करत आहे त्यामुळे त्यांचा हा विशेष अधिकार काढून घेण्यात यावा ही मागणी सुद्धा या पत्रकार परिषदेत संयुक्त रित्या करण्यात आली.

Similar News