Dolo 650 ची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना एक हजार कोटींचे गिफ्ट दिल्याचा दावा , सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे मागितले उत्तर
कोरोना काळात रूग्णांना मोठ्या प्रमाणात देण्यात येणाऱ्या Dolo 650 या गोळीचे नाव प्रिक्रिप्शनवर लिहून देण्यासाठी डॉक्टरांना एक हजार कोटी रूपयांचे गिफ्ट कंपनीने दिले असल्याचा आरोप करत फेडरेशन ऑफ मेडिकल सेल्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून उत्तर मागवले आहे.;
कोरोना काळात लोकप्रिय ठरलेल्या Dolo-650 या गोळीची विक्री वाढवण्यासाठी कंपनीकडून डॉक्टरांना एक हजार कोटी रुपयांचे गिफ्ट्स दिल्याचा आरोप फेडरेशन ऑफ मेडिकल सेल्स अँड रिप्रेंझेटिव्ह असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. तर याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील संजय पारिख यांनी बाजू मांडली.
वकील संजय पारिख यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स या संस्थेच्या अहवालाचा हवाला दाखला दिला. त्यामध्ये रुग्णांना ताप असल्यास Dolo-650 चे नाव सुचवण्यासाठी डॉक्टरांना एक हजार कोटी रुपयांचे गिफ्ट्स वाटल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्यावर बोलताना न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही जे सांगत आहात ते ऐकून मलाच वाईट वाटत आहे. कारण कोरोना काळात हेच औषध मलासुध्दा देण्यात आले होते. हे प्रकरण गंभीर असल्याने सरकारने यावर उत्तर द्यावे, असे आदेश न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत.
तसंच डॉक्टरांवर अशा प्रकरणांमध्ये केस चालते. मात्र यातून मेडिकल कंपन्या मात्र वाचतात. त्यामुळे विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना गिफ्ट्स वाटणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यायला हवी, असं मत न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आठ दिवसात केंद्र सरकारला उत्तर मागितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी दहा दिवसानंतर होणार आहे. तर यासंदर्भात लाईव्ह लॉ या कायदेविषयक पोर्टलने वृत्त दिले आहे.