विजयाच्या जल्लोषात काबूलमध्ये गोळीबार, १७ जणांचा मृत्यू

Update: 2021-09-04 08:03 GMT

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर पहिल्यांदाच काबूलमध्ये शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. इथे करण्यात आलेल्या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४१ जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काबूलमध्ये करण्यात आलेल्या जल्लोषपर गोळीबारामुळे ही भीषण घटना घडली आहे. तालिबानने पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केल्यानंतर हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा कब्जा घेतला आहे. पण पंजशीर खोऱ्यामध्ये अजूनही तालिबानला आपली सत्ता स्थापन करता आलेली नाही, इथे बंडखोर तालिबानविरोधात लढा देत आहेत.

पंजशीरमध्ये तालिबानी सैनिक आणि बंडखोर सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. या दरम्यान तालिबानने पंजशीर प्रांतावर कब्जा मिळवल्याचा दावा केला. त्यानंतर काबूलमध्ये जल्लोष म्हणून गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण बंडखोर गटाने तालिबानचा दावा फेटाळत पंजशीर प्रांत अजूनही आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. दरम्यान तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने अशाप्रकारे जल्लोष करताना गोळीबार करणाऱ्यांना फटकारले आहे, तसेच दहशतवाद्यांनी आता थांबावे असे आवाहन केले आहे.

Tags:    

Similar News