रायगड - जिल्ह्यातील पालीतील सरसगड किल्ल्यावर प्रचंड मोठा वणवा पेटल्याने किल्ल्याच्या आसपासची अनेक झाडं जळून खाक झाली आहेत. यामध्ये किल्ल्यावर नव्याने लावलेली रोपं आणि संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली आहेत. याशिवाय येथील माकडे, वानरे आणि पक्षांच्या अन्नाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला आहे.
गेल्या आठवड्य़ातही गुरुवारी सरसगडावर वणवा पेटला होता. हा वणवा 24 तासांपेक्षा जास्त काळ सुरू होता. स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे पुढील हानी टळली नाहीतर हा वणवा किल्ल्याची खाली असलेल्या मानवी वस्तीपर्यंत येण्याची शक्यता होती. किल्ल्याच्या परिसरात लागणारे हे वणवे जाणूनबुजून लावले जात असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. जे कोणी लोक वणवा लावत आहेत त्यांना शोधून कडक शासन करण्याची गरज असल्याची मागणी शिवऋण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केतन म्हसके यांनी केली आहे. कृत्रीम वणव्यांमुळे त्या परिसरातीरल जीवसृष्टी धोक्यात येते आणि पर्यावरणाचादेखील -हास होतो.
त्यामुळे असे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जातात आणि त्याचबरोबर जनजागृतीही केली जाते. या उपयांबरोबरच आता स्थानिकांना आणि आदिवासींना वणव्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले पाहिजे, त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे मतही पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले आहे.