राज्यातील रुग्णालयांची अग्निसुरक्षा धोक्यात असल्याचे दाखवणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. पण या घटनांमधून कोणताही धडा घेतला जात नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विरारमधील हॉस्पिटलच्या आगीची दुर्घटना ताजी असताना आता मुंब्रा इथेही अशीच घटना घडली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. मुंब्रा येथील prime hospital ला रात्री 3 वाजता आग लागली. या आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. मदत कार्य सुरू असून आग आटोक्यात आली आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.
भंडाऱ्यापासून सुरू झालेल्या हॉस्पिटल्सच्या आगींचं सत्र अजूनही थांबलेले नाही. या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व हॉस्पिटल्सच्या अग्निसुरक्षेचे ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण या घटनांवरुन असे कोणतेही ऑडिट झाले नसल्याचे दिसत असल्याची टीका होते आहे.