मुंबईत फटाकेबंदी, महापालिकेतर्फे नियमावली जाहीर
कोरोनामुळे मुंबईत यंदा फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेने खास दिवाळी सेलिब्रेशनसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवश खासगी परिसरात फटाके त्यातही फुलबाजी आणि पाऊस फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 'कोविड'ची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनीच अधिकाधिक काळजी घेण्याची गरज महापालिकेने व्यक्त केली आहे.
दिवाळी साजरी करताना शक्यतो एकमेकांच्या घरी जाणे टाळावे, फटाक्यांच्या धुराचा 'कोविड - १९' बाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवायचा आहे. जेणेकरुन घरात येणा-या प्रत्येक व्यक्तिला हात – पाय – चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल, अशा मार्गदर्शक सूचना महापालिकेतर्फे करण्यात आल्या आहेत. तसेच सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असल्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.
फटाक्यांबाबत मार्गदर्शक सूचना
- 'कोविड - १९' बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची प्राणवायू पातळी खालावण्याची शक्यता असते. फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही.
- हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत.
- नियमभंग करणाऱ्यांवर महानगरपालिका व पोलीस यांच्याद्वारे संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात येईल
- १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे अंगण / घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी 'कोविड' विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, शारीरिक दुरीकरण पाळणे व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावयाची आहे.
- 'कोविड'च्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये.
- 'कोविड'विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी
- 'कोविड'च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळसण साजरा करताना शारीरिक दुरीकरण पाळणे, वारंवार साबणाने सुयोग्यप्रकारे हात धुणे आणि घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी सुयोग्यप्रकारे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
- यंदाच्या दिवाळीत दरवाजाजवळ रांगोळी काढताना अगर दिवे लावताना त्यासोबतच आठवणीने पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजाजवळ ठेवावयाचा आहे. जेणेकरुन, घरात प्रवेश करणाऱया प्रत्येक व्यक्तिला सुयोग्यप्रकारे हात – पाय – चेहरा धुवूनच घरात प्रवेश करता येईल.
- यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करावयाची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावे.
- दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या / नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे वा दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) द्याव्यात.
- भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.
- अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय व चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात – पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना व प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.
- दिवाळीकरिता काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे.
असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.