मुजफ्फरनगरमधील खुब्बापुर येथे नेहा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेने मुस्लिम मुलाला इतर मुलांकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्या प्रकरणी अल्ट न्यूजचे पत्रकार मोहम्मद झुबैर यांच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील खुब्बापूर येथील शाळेत शिक्षिकेने मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी विष्णू दत्त नावाच्या एका व्यक्तीने मन्सूरपुर पोलिस स्टेशनमध्ये मोहम्मद झुबैर यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे.
मोहम्मद झुबैर यांनी 25 ऑगस्ट रोजी नेहा पब्लिक स्कूलच्या खुब्बापूर येथील शाळेसंदर्भातील व्हायरल व्हिडीओतील विद्यार्थ्याची माहिती उघड केली होती. त्यामुळे हे बाल न्याय अधिनियमानुसार बालकांच्या अधिकारांचे हनन आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात मोहम्मद झुबैर यांनी सांगितलं की, तसं तर अनेक न्यूज चॅनलने राजकीय नेत्यांसोबतच अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र माझ्यावर FIR दाखल करण्यात आली. मी तो व्हिडीओ तातडीने डिलीट केला होता. मात्र त्यानंतरही मला सिंगल आऊट केलं जाणं यातून हेच स्पष्ट होत आहे की, मला टार्गेट करण्याचा उद्देश आहे.