उद्रेकानंतर अखेर ठरलं ! २१ मार्चलाच होणार राज्यसेवापूर्व परीक्षा

Update: 2021-03-12 06:25 GMT

कोरोना संसर्गकाळात अचानकपणे राज्यसेवा आयोगाने राज्यसेवापूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभर झालेल्या उद्रेकाची दखल घेत काल रात्री मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

निश्चित झाल्याप्रमाणे १४ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी मोठा उद्रेक झाला होता. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. विदयार्थी आक्रमक झाल्यानंतर आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली होती.

मंत्र्यांनी परस्परविरोधी विधानं आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून संबोधित करत नवी तारीख याच आठवड्यात जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं . त्यानुसार राज्यसेवा आयोगानं आज परीपत्रक प्रसिध्द करत नवी तारीख जाहीर २१ मार्च जाहीर केली आहे. आता या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल असे आयोगाने स्पष्ट केलं आहे.

२७ मार्च आणि ११ एप्रिलची परीक्षा वेळेतच होणार तसंच याशिवाय इतर परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसंच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं देखील आयोगानं स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा १४ मार्चला घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. आयोगाने परीक्षेची प्रवेशपत्रेही उपलब्ध करून दिली होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी दुपारी जाहीर केल्यानंत राज्यभर उद्रेक उफाळून आला होता. करोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती.

संतापलेल्या परीक्षार्थींनी पुण्यात मोठ्या संख्येने एकत्र येत दुपारी शास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम सातपुते आणि विविध संघटनांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. राज्य शासनाने परीक्षा घेण्याचे नवे परिपत्रक जाहीर केल्याशिवाय रस्ता न सोडण्याची भूमिका उमेदवारांनी घेतली. त्यामुळे पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह शास्त्री रस्त्यावर दाखल झाले, दंगलविरोधी पथकालाही पाचारण करावे लागले. रात्री उशिरा आंदोलनकांना अटक देखील करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानं तुर्तास हा विषय आता मिटला असून १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा आता पार पडणार आहेत.


Tags:    

Similar News