अखेर दहाव्या दिवशी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला स्थगिती

Update: 2024-06-22 12:35 GMT

आज सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आलेले होते दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळा सोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान यावेळी शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी तब्बल दहा दिवसांपासून सुरू असलेले उपोषणास स्थगिती दिली आहे. दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत, सगेसोयरेचा आदेश आणखी आला नाही, तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आले आहे. तर इतर मागण्यांवर शासनाची श्वेत पत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे हाके यांनी जाहीर केले आहे.

आज दुपारी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर शिष्टमंडळ दाखल झाले. शिष्टमंडळाची विमानतळावरच काही वेळ बैठक झाली. त्यानंतर ते जालन्यातील उपोषणस्थळ वडगोद्रीच्या दिशेने रवाना झाले. दुपारी सव्वा दोन वाजेला शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासोबत शिष्टमंडळाने सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती दिली, तसे पत्र दिले. त्यानंतर हाके यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यावेळी हाके म्हणाले, आम्ही मागणी केलेल्या तीन मुद्यांची पूर्तता होईल असे शासनाने लिखित स्वरूपात दिले आहे. तर आणखी दोन मुद्दे पूर्ण झाले नाहीत. यापुढे हे आंदोलन सुरूच राहील. विक्रमी वेळेत बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शासनाने बोगस प्रमाणपत्र काढणारे आणि ते देणारे या दोघांवर कारवाई करण्यात येईल असे शासनाने सांगितले आहे. पुढचा लढा पंचायतराज मधील ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा आहे, असेही हाके यांनी जाहीर केले.

यावेळी शासनाच्या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री होते तर गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते यावेळी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र भरातून मोठया संख्येने ओबीसी बांधव उपोषणस्थळी आलेली होती

Tags:    

Similar News