धक्कादायक : मागासवर्गीय समाजावर बहिष्कार, औषधांसह जीवनावश्यक वस्तू बंद केल्याचा आरोप
few people boycott backward class people after clashes between 2 groups in nanded district;
कुलदीप नंदूरकर
नांदेड : जिल्ह्यातील रोही पिंपळगाव येथे दोन समाजात तणाव निर्माण झाल्यानंतर मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांनी जयघोष केल्याच्या कारणावरून मराठा समाजातील तरुणांनी मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. तसेच याप्रकरणी आरोपींवर ऍट्रोसिटीचा गुन्हा झाल्यानंतर गावाने मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घातल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
गावातील मेडिकलवरील औषधी, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी मागासवर्गीय समाजासाठी बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबतच दुधाचा व्यवसाय करणाऱ्या मागासवर्गीय तरुणांकडून डेअरीत दूध खरेदी देखील बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर एखाद्या मागासवर्गीय व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडेही घेण्यास मज्जाव करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याचबरबोर आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप दीपक बळवंते या तरुणाने केला आहे. या गावात १५ वर्षांपूर्वी देखीला जयंतीच्या रॅलीवरुन वाद झाला होता, त्यावेळीही अशाच प्रकारे बहिष्कार टाकण्यात आल्याचे दीपक यांनी सांगितले. तर दोन दिवसांपूर्वी शेजारच्या एका वृद्ध व्यक्तीच्या निधनानंतरही गावातील लोकांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडे व अन्य साहित्य उपलब्ध होऊ दिली नाही असा आकोर करण केळकर यांनी केला आहे.
गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोविंद दौलतराव शिंदे यांना यासंदर्भात संपर्क साधला असता, "गावात या प्रकारचे वितुष्ट कधीही नव्हते. गावात थोडा तणाव निर्माण झाला होता हे खरे आहे, पण तरीही बाहेरगावाहून येणाऱ्या नेत्यांनी आमच्या गावात येऊन कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण करू नये, अशी विनंती अशी विनंती शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगितले.
याप्रकरणी शनिवारी पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीत गावातील दोन्हीही समाजाची बैठक झाली. दोन्ही गटातील वितुष्ट दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यापुढे सामोपचाराने आपापसातील वाद मिटवून घ्यावेत असेही प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी सांगितले.
कुलदीप नंदूरकर