सोयबीन पिकाचा लागवड खर्च दुपट्टीने वाढल्याने शेतकरी चिंतेत
बुलडाणा येथील मुख्य पीक असलेल्या सोयबीन वर चक्रीभुंगा आणि खोड अळीने आक्रमण केल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सोयबीनचा लागवड खर्च यंदा दुपट्टीने वाढला आहे.;
राज्यातील शेतकऱ्यांवरचे आस्मानी आणि सुल्तानी संकटं काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ शेतकऱ्यांची परीक्षा घेतोय. त्यातच आता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळलंय. बुलडाणा येथील मुख्य पीक असलेल्या सोयबीन वर चक्रीभुंगा आणि खोड अळीने आक्रमण केलं आहे.
तीन चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे बुलडाण्यातील शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे, त्यातच मागच्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे तर सर्वकाही ठप्प आहे, शेतमाल विकण्यासाठी बाजारपेठ न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांवर हे नवं संकट ओढावलं आहे.
शेत कामाला मजुर नाही , पिकाला भाव नाही यामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने कर्ज काढून का होईना शेतीची मशागत केली, पेरणीही केली. मात्र , बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाचे पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनीवर चक्रीभुंगा आणि खोडअळीने हल्ला चढवला.
बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 94 टक्के शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, जिल्ह्यात गेल्या वर्षी 3 लाख 84 हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती, तर यावर्षी आतापर्यंत 3 लाख 55 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र वरवर हिरवे गार दिसणारे पीक किटकांनी आतून पोखरलं आहे. पिकावर चक्रीभुंगा आणि खोडअळीने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यानी कीटकनाशकांची दोन वेळा फवारणी केली, मात्र अजूनही त्याचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट झालेला नाही, त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने सोयाबीन पीकात मोठ्या प्रमाणात गवत आणि विविध प्रकारचे तण वाढले आहे. त्यामुळे यंदा मशागतीचा खर्च दुप्पट तिप्पट वाढल्याचे महिला शेतकरी तेजस्विनी पवार यांनी सांगितले आहे.
सोयाबीनच्या पेरणीपूर्व मशागती पासून साधारणपणे एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो मात्र यावर्षी या खर्चात वाढ होऊन हा खर्च 25 हजारापर्यंत गेला असल्याचे शेतकरी सांगतायत.शेतकऱ्यांची सोयाबीन घरात आली की भाव असतो 3 हजाराच्या आसपास , म्हणजे शेतकऱ्यांना सोयाबीनचे एकरी उत्पन्न होते 15 हजार रुपये आणि खर्च होतो 20 हजार रुपयांच्या जवळपास. म्हणजे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही यामधून निघत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे.
पिकांवरील वाढता खर्च, किडींचा प्रादुर्भाव, मिळणार उत्पन्न या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने इतरत्र मदत करण्यापेक्षा सोयाबीनला 10 हजार रुपये हमीभाव द्यावा, अन्यथा येणारी पिढी शेतात पाय देखील ठेवणार नाही असंच म्हणण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आली आहे.