'विहीर गेली चोरीला'; शेतकऱ्याच्या तक्रारीने महसूल अधिकारी वठणीवर!
'सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशा पद्धतीने वागणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना औरंगाबादच्या एका सामान्य शेतकऱ्याने चांगलाच धडा शिकवला;
औरंगाबाद: 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशा पद्धतीने वागणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना औरंगाबादच्या एका सामान्य शेतकऱ्याने चांगलाच वठणीवर आणलं आहे. त्याच्या एका तक्रारीने प्रशासनाला काही तासात दखल घेऊन, निपटारा करावा लागला. तसेच यातून महसूल विभागाचा बेजबाबदारपणा सुद्धा समोर आला.
सकाळपासून सोशल मीडियावर विहीर चोरीला गेल्याची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अनाड गावातील भावराव रंगनाथ गदाई या शेतकऱ्याने आपली विहीर चोरीस गेल्याची तक्रार अजिंठा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. ही तक्रार पाहून पोलीसही चक्रावून गेले.
गदाई यांनी आपल्या तक्रारीत म्हंटलं आहे की,अनाड शिवारातील गट क्रमांक 189 मध्ये माझी 88 आर जमीन आहे. सातबारा नोंदीप्रमाणे शेतात स्वतंत्र विहीर व कूपनलिका (बोअरवेल) आहे. शुक्रवारी सकाळी मी शेतात गेलो असता विहीर आढळून आली नाही. ती चोरी गेली आहे. मी शेतात मिरची लागवड करणार होतो. आता विहिरीची चोरी झाली. यामुळे मी आर्थिक संकटात सापडलो असून विहिरीचा शोध घ्यावा. अशी तक्रार शेतकरी गदाई यांनी पोलीस अधीक्षक, तहसीलदार, अजिंठा पोलीस येथे दाखल केली.
यानंतर शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर विहीर चोरी झाल्याची तक्रार व्हायरल झाली. शेवटी या तक्रारीची तहसीलदारांनी दखल घेतली आणि प्रकरण समजवून घेत प्रकरण निकाली काढले.
शेतकऱ्यांने असा शिकवला धडा!
गदाई यांनी जानेवारी २०२० मध्ये शेतात बोअरवेल केली होती.त्यानंतर सातबारावर बोअरची नोंद घेण्यासाठी तलाठी यांच्याकडे पाठपुरवठा केला.मात्र पाहणीसाठी आलेल्या तलाठीने सातबारावर बोअरसोबत विहीर नसताना सुद्धा विहिरींची नोंद घेतली.
त्यामुळे गदाई यांना शासकीय योजनेत आता विहिरीची मंजुरी मिळत नाही. यासाठी सातबारावरून विहिरींची नोंद हटवा म्हणून गेल्या वर्षभरापासून भावराव गदाई महसूल विभागात खेट्या घालत आहेत. मात्र, ती नोंद रद्द झाली नाही. यामुळे त्रस्त होऊन भावराव गदाई यांनी विहीर चोरी झाल्याची तक्रार केली.
गदाई यांची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल होताच, महसूल प्रशासन जागं झालं, आणि काही तासात दखल घेत गदाई यांच्या सातबारावरुन विहिरींची नोंद हटवण्यात आली.