दिल्लीमध्ये नवीन कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा ५२वा दिवस आहे. २६ जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतही राजभवानवर मोर्चा काढण्याची घोषणा संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. 23 ते 26 जानेवारीपर्यंत देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी आणि कामगार वर्ग आंदोलन करणार आहेत.
23 जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आझाद मैदानावर येणार आहेत आणि 24 जानेवारीपासून आझाद मैदानावर ठिय्या मुक्काम आंदोलन होणार आहे. तर 25 जानेवारीला दुपारी 2 वाजता हा मोर्चा राजभवनावर जाईल आणि राज्यपालांना एक समिती जाऊन भेटणार आहे. तसेच कृषी कायदे रद्द करा अशी मागणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 26 जानेवारीला आझाद मैदानावर राष्ट्रीय ध्वजारोहण केले जाईल व मोर्ची सांगता होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. #MaxMaharashtra