महाराष्ट्र पेटला तर पंजाब आणि हरियाणा पेक्षाही मोठा भडका: राजू शेट्टी
मला राज्य सरकारला एक सांगायचे आहे. त्यांनी केंद्राला निरोप द्यावा, एकदा जर महाराष्ट्र पेटला तर पंजाब आणि हरियाणा पेक्षाही मोठा भडका उडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.;
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 'आत्मक्लेश जागर' आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीचे राज्यभरात जागर आंदोलन सुरू आहे. भजन, अभंग म्हणत रात्रभर हे जागर आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमधील काल चौथी बैठक तब्बल सात तास चालली. पण या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. ही बैठक संपल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मात्र बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून पुढच्या बैठकीत या वादावर सकारात्मक तोडगा निघेल, असा दावा केलेला आहे. त्याचबरोबर हमीभावाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये , हमीभावाला केंद्र सरकार धक्काही लावणार नाही, असं स्पष्ट केलेले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरुच राहील असं सांगितलं असून देशभरातून आणि जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा वाढत चालला आहे.