दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. पण त्याआधी सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स पाडल्यानंतर मात्र इथले वातावरण चिघळले. सिंघू, टीकरी आणि गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी गेल्या २ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.
आज सकाळी या तिन्ही ठिकाणांवरुन दिल्लीत प्रवेश करण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले. हजारो शेतकरी पायी आणि ट्रॅक्टरमधून दिल्लीकडे निघाले. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पण आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडल्याने पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर शेतकऱ्यांनी रॅलीची परवानगी देण्यात आली होती.
पण सकाळी ८ वाजल्यापासूनच दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर काहींनी बॅरिकेड्स तोडून दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इथे संघर्ष झाला. यामध्ये काही पोलीसही जखमी झाले आहेत.