रशियन पंटर्ससाठी भारतात केलं गेलं फेक IPL चं आयोजन

भाड्याची जमिन, ४०० रूपये रोजावर खेळणारे खेळाडू, ५ कॅमेऱ्यांचा सेट, ४ फ्लड लाईट्स, सामने युट्यूबवर लाईव्ह अगदी खऱ्या IPL चा साज चढलेली फेक IPL माहितीये का? इतर कुठे नाही आपल्याच देशात घडलीये पण रशियन पंटर्ससाठी... कशी? जाणून घ्या या लेखात.;

Update: 2022-07-13 11:08 GMT

 हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सने IPL चषक काय उंचावला की गुजराती जनतेचा कउर भरून आला. इतका की त्यांनी पुन्हा एक IPL स्पर्धा घडवून आणली. आपण म्हणाल काय? हे कसं शक्य आहे. रोहित शर्मा आणि इतर सर्व खेळाडू तर इंग्लंडमध्ये मालिका खेळतायत. मग गुजरातमध्ये IPL कशी काय? मित्रांनो ही स्पर्धा खरी खुरी नसून एक मायाजाळ होतं. पण खऱ्या IPL स्पर्धेसारखं! या फेक IPL ची काय भानगड आहे चला जाणून घेऊयात.

गुजरातमध्ये मुल जन्माला येतानाच मुळी व्यावसायिक म्हणुन जन्माला येतं. गुजराती माणसाच्या शरीरात नसांमध्ये रक्त नाही तर व्यवसाय वाहतो असंही गंमतीने म्हटलं जातं. अंबानी कुटूंब, टाटा कुटूंब, अदानी कुणा कुणाची नावं घ्यायची. सगळ्यांचं बीज हे गुजरातमधलंच. पण याच्याच अगदी उलट हर्षद मेहता, मेहुल चोक्सी, ललित मोदी, नीरव मोदी अशी देखील काही नावं आपल्याला समोर आलेली पाहायला मिळाली आहेत. असाच एक गुजराती माणूस ज्याचं नाव शोएब आहे त्याने ही फेक IPL स्पर्धा घडवून आणली.

असं झालं फेक IPL स्पर्धेचं आयोजन

शोएब काही काळापुर्वी नोकरीसाठी रशियाला गेला होता. आठ महिने रशियातील एका पबमध्ये त्यानं काम केलं. तिथं त्याची ओळख आसिफ मोहम्मदशी झाली. त्या दोघांची मैत्री झाली. गप्पा गप्पांमध्ये आसिफला ही फेक IPL ची कल्पना सुचली. सगळं प्लॅनिंग झालं आणि त्यानुसार शोएब भारतात परतला. त्याने गुलाम मसीह नावाच्या शेतकऱ्याकडून एक शेतजमीन भाड्याने घेतली. तिथे एक खरीखुरी खेळपट्टी तयार करण्यात आली. मैदानात हॅलोजन दिवे लावण्यात आले. सामन्यांच्या चित्रिकरणासाठी ५ एचडी कॅमेऱ्यांचा सेट लागला. समालोचन म्हणजेच कॉमेंट्रीसाठी हर्षा भोगले यांचा आवाज काढता येणाऱ्या व्हॉइसओव्हर कलाकाराला वापरण्यात आलं. सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांचा आवाज वापरण्यात आला. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सगळी तयारी झाली होती. आता फक्त खेळाडू आणि पंचांची कमी होती. भावांनो इतकी तयारी करणाऱ्यांना खेळाडू आणणं किती कठीण होतं. या शोएबने खेळाडू म्हणून चक्क शेतमजुरांच्या २१ पोरांना हायर केलं. तेही फक्त ४०० रूपयांवर. पंचांबाबतही तेच.... मग नेमण्यात आले काही कॅमेरामन आणि खेळाडूंसाठी कही जर्सी विकत घेण्यात आल्या. एकदम रस्ते का माल सस्ते मे टाईप. सगळ्यात महत्वाचं सामने खेळवले तर ते दाखवता तर आले पाहिजेत ना ते ही रशियामध्ये... मग काय यु ट्यूब जिंदाबाद म्हणत या पठ्ठ्याने स्पर्धा सुरू केली.

एक मिनिट ज्या हेतूने ही स्पर्धा भरवली गेली त्याचं काय? तर जरा थांबा सांगतो. टेलिग्रामवर एक ग्रुप तयार करण्यात आला. या सर्व सट्टेबाजांसाठी या स्पर्धेचा जन्मदाता आसिफने रशियात वर्कशॉप देखील घेतलं. शोएब टेलिग्राम चॅनेलवरुन लाईव्ह सट्टेबाजी करायचा. यानंतर तो अम्पायरला चौकार किंवा षटकारसाठी सूचना द्यायचा. नंतर बॅट्समन आणि बॉलर्सना याची माहिती दिली जायची. सूचना मिळाल्यानंतर गोलंदाज धीम्या गतीने चेंडू फेकायचे आणि मग लागायचे खऱ्या IPL सारखे मॅक्झिमम्स......

पण खोटं जास्त काळ टीकत नाही हेच खरं. हा सट्टाबाजार उघडा पडला. या फेक IPl ची क्वार्टर फायनल पार पडण्यापुर्वीच गुजरात मधील मेहसाना पोलिसांना या स्पर्धेची टीप मिळाली. या प्रकरणात आता पोलिसांनी एकूण चौघांना अटक केलीये. या वरून आपल्या देशात सट्टा कायदेशीर नाही हे आपल्याला कळालच असेल. पण बेकायदेशीर असला तरी भारतीय ऑनलाइन सट्टाबाजाराचं बाजारमुल्य हे अंदाजे सहा हजार कोटींचे आहे असं सट्टे बाजी करणारी कंपनी पॅरीमॅच सांगते. याचमुळे की काय अनेक परदेशी सट्टेबाजीची ठिकाणं भारतीय चलनात सट्टेबाजीला परवानगी देतात. कशी वाटली ही माहिती आम्हाला प्रतिक्रीयांद्वारे नक्की कळवा.

Tags:    

Similar News