आर्मीचा गणवेश घालून फिरणाऱ्या तोतयाला अटक , नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातून घेतलं ताब्यात
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरी परिसरात तोतया लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून हा तोतया व्यक्ती अतिसंवेदनशील लष्करी परिसरात फिरत असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नाशिक // नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरी परिसरात तोतया लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून हा तोतया व्यक्ती अतिसंवेदनशील लष्करी परिसरात फिरत असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीकडे लष्कराच्या कँटीनचे कार्ड तसेच त्याच्या गाडीवर लष्कराचा लोगो देखील आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गणेश पवार असं अटक करण्यात आलेल्या 26 वर्षीय तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे. तो चांदवड तालुक्यातील हरसूल येथील रहिवासी असल्याचं समजतंय माहिती शिवाय तो काही दिवस नांदुकरनाका येथे वास्तव्याला असल्याचंही त्याने सांगितलं आहे. ही माहिती मिळताच दोन्ही ठिकाणी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहे. आर्मी इंटेलिजन्स ब्युरोच्या पथकाने या इसमाला ताब्यात घेतलं असून या घटनेचा कसून तपास सुरू आहे.
आरोपी गणेश पवार हा मंगळवारी रात्री लष्करी अधिकारी असल्याचं सांगून देवळाली कॅम्प परिसरातील स्कूल ऑफ आर्टिलरी परिसरात फिरत होता. यावेळी येथील काही अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी गणेशला अडवून चौकशी केली. चौकशी सुरू असताना त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. यातून बिंग फुटताच अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना दिली.
आरोपीचा उद्देश नेमका काय होता? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आरोपीचा कसून तपास केला जात आहे. लष्करी कॅम्प सारख्या संवेदनशील परिसरात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.