कल्याण : डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध महिलेचा अत्यंसंस्कारादरम्यान गॅस शवदाहिनाचा भडका उडाला. या भडक्यात कर्मचाऱ्याचा चेहरा भाजला आहे. मात्र , घटना घडल्यानंतर तब्बल एक तासानंतरही रुग्णवाहिका पोहचली नाही . सध्या कर्मचाऱ्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या एका वयोवृ्द्ध महिलेचा मृत्यू झाला. नातेवाईक तिचा मृतदेह घेऊन पाथर्ली स्मशानभूमीत घेऊन गेले. गॅस शवदाहिनीमध्ये महिलेचा मृतदेह टाकताच भडका उडाला. या भडक्यात कंत्राटी कर्मचारी गोपाळ अडसूळ यांचा चेहरा भाजला. मृत महिलेचे नातेवाईक ही घटना पाहून हैराण झाले. यात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुरेंद्र ठोके हे देखील उपस्थित होते. त्यांनी रुग्णवाहिकेसाठी 108 वर क्रमांकावर संपर्क केला.
त्यानंतर पोलिसांना संपर्क केले. पाऊन तास रुग्णवाहिका आलीच नाही अखेर जखमी गोपाल यांना घेऊन शास्त्रीनगर रुग्णालय गाठले. त्याठिकाणी त्यांना सांगितले गेले. उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जा. जवळपास दीड तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. याबाबत ठोके यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांनी हतबलता दर्शवली. गोपाळ यांच्यावर कळवा रुग्णलयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.