कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक, आणखी कुणाला अटक होणार?
पनवेलमंधील कर्नाळा सहकारी बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्या प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना मंगळवारी मुंबई ईडीने अटक केली. त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पनवेल संघर्ष समितीने यासदंर्भात कारवाईसाठी ईडीकडे लेखी तक्रार केली होती. पनवेलमधल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 500 कोटींवरील घोटाळ्याला विवेक पाटील आणि संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. या बँकेत जवळपास 50 हजार 689 लोकांच्या ठेवी आहेत. गेल्या काही वर्षात या नेत्यांनी उद्योग व्यवसायासाठी या ठेवींचा गैरवापर केला. एवढेच नाही तर ऑडिटमध्ये हा घोटाळा दडपण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
कर्नाळा बँकेतील घोटाळ्याचा ईडी स्वतंत्ररित्या तपास करत आहे. त्यामुळे विवेक पाटील यांच्यानंतर आता कुणाचा नंबर लागतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेमके प्रकरण काय?
शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाळा सहकारी बॅकेच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या वाहनांची जप्ती या आधी झाली होती. आता थेट अटक झाल्याने गुंतवणूकदारांच्या लढ्याला यश मिळण्याची चिन्हे आहेत.
कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत सुमारे 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्याबद्दल राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू होता. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्याने अंमलबजावणी संचालनालयाला त्याच्या तपासाचा अधिकार मिळतो. त्यानुसार चौकशी सुरू होती. पाटील यांनी रात्री पावणेनऊच्या सुमारास राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय मिळावा म्हणून रिझर्व्ह बॅंकेवर मोर्चा काढण्यात आला होता. तसेच या घोटाळ्यातील आरोपांनी शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र विवेक पाटील यांना महाविकास आघाडी सरकार वाचवत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. पाटील यांच्या मालमत्तेवर या आधीच टाच आणण्यात आली आहे. त्यांच्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. सहकार खात्यामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती.