माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक, रावसाहेब दानवेंचा हात असल्याचा वकिलाचा आरोप
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक झाल्यानंतर त्यांनी वकिलांमार्फत रावसाहेब दानवेंवर गंभीर आरोप केले आहेत.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील कौटुंबिक वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पुण्यात एक महिला आणि व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
18 तारखेला पुन्हा यावर सुनावणी होणार आहे. मात्र हर्षवर्धन जाधव यांची अटक ही राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप जाधव यांच्या वकिलाने केला आहे. यामागे हर्षवर्धन जाधव यांचे सासरे रावसाहेब दानवे यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे. "जी घटना सोमवारी घडली आणि त्याबाबतचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला, यामागे राजकीय षडयंत्र आहे. फिर्याद दिलेल्या अमन चड्डा आणि खडकीतील स्थानिक नगरसेवकांनी हर्षवर्धन जाधव आणि त्यांची सहकारी इषा झा हिला लैंगिक शिवीगाळ केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
हर्षवर्धन जाधव यांची तक्रार पोलीस घेतं नसल्याचं सांगत, जाधवांच्या अटकेमागे रावसाहेब दानवेंचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यात असलेली कौटुंबिक भांडण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.