अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 12 नोव्हेंबरला जामीन अर्जावर सुनावणी...

Update: 2021-11-06 11:22 GMT

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 12 तासांच्या चौकशीनंतर मंगळवारी ED ने त्यांना अटक केली होती. ED ने न्यायालयात अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं.

त्यानंतर न्यायालयाने देशमुख यांना ED ची कोठडी सुनावली होती. ED च्या कोठडीची मुदत आज संपली. त्यानंतर आज अनिल देशमुख यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची रवानगी तुरुंगात होणार की, त्यांना जामीन मिळणार असा सवाल उपस्थित होत असताना अनिल देशमुख यांच्या वकीलाने लगेच जामीन अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर 12 नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे.

दरम्यान आज न्यायालयात ED ने अनिल देशमुख यांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ही मागणी फेटाळून लावत अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. या स्फोटक कार प्रकरणामागे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे असल्याची बाब समोर आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली होती. या बदलीनंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपयांचं खंडणी वसुल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी सध्या ED करत आहे.

Tags:    

Similar News