#AnilDeshmukhअनिल देशमुख पुन्हा जेल की बेल: आज निर्णय होणार

मनी लॉंडरींगप्रकरणात जेलमधे असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्यावरील शस्त्रक्रीयेसाठी अर्ज करण्यात आला असून आज सुनावणी होणार असून जेल की बेल आजच कोर्ट निर्णय देणार आहे.;

Update: 2022-05-10 02:23 GMT


१०० कोटीच्या वसुली प्रकरणावरुन राजीनामा दिल्यानंतर सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉंडरींगप्रकरणात अनिल देशमुख यांच्या धाडसत्र झाले होते. सध्या ते ऑर्थररोड जेलमधे न्यायालयीन कोठडीत आहेत. उजवा खांदा निखळला असून उपचारासाठी वैद्यकीय जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे आज निर्णय देणार आहेत. .

उजवा खांदा निखळल्याने त्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमचे उपचार घेण्यासाठी हंगामी जामीन मंजूर करावा, अशी विनंती देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत अर्जाद्वारे केली आहे. मात्र, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याला प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करत खासगी रुग्णालयातील उपचारांना विरोध दर्शवला. 'देशमुख यांचा जे. जे. रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल पाहता त्यांचा खांद्याचा आजार जुना आहे.

त्यांना तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. शस्त्रक्रिया करायचीच झाल्यास ती जे. जे. या सरकारी रुग्णालयातही होऊ शकते. जे. जेमध्ये डॉ. अंकित हे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून त्यांनी आतापर्यंत अशाच प्रकारच्या ३० ते ३५ शस्त्रक्रिया केलेल्या आहेत', असे म्हणणे ईडीने आपल्या वकिलांमार्फत मांडले.

तर 'कोणत्या रुग्णालयात व कोणत्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत, हा अर्जदाराचा (देशमुख) हक्क आहे. देशमुख यांचा खांद्याचा आजार जुना आहे आणि तुरुंगात पडल्याने त्याचा त्रास खूप वाढला आहे. म्हणूनच जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला आहे. ते ज्येष्ठ नागरिक आहेत. उपचारांचा खर्च ते स्वत: उचलणार असतील तर ईडी त्यांना सरकारी रुग्णालयातच उपचार घेण्याची सक्ती करू शकत नाही', असा युक्तिवाद निकम यांनी केला.

त्यानंतर न्यायाधीशांनी आपला निर्णय राखून ठेवत आज निर्णय देणार आहेत. दरम्यान १०० कोटी वसुलीच्या आरोपावर सरकारने नेमलेल्या न्या. चांदिवाल आयोगाने अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून या अहवाला अनिल देशमुखांना क्लिनचीट दिल्याचे सांगितले जात आहे.

Tags: 

Tags:    

Similar News