#लॉकडाऊन यात्रा : इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय ठप्प, व्यावसायिक हतबल
आधी लॉकडाऊन आणि नंतर कोरोनाचे निर्बंध यामुळे मंडप डेकोरेटर्स, केटरर्स यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पण आता या व्यावसायिकांनी सरकारला इशारा दिला आहे.;
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यभरातील इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय ठप्प झाले आहेत. यामध्ये मंडप बिछायत, इलेक्ट्रिक, डेकोरेशन, साऊंड सिस्टम, केटरर्स यांना सर्वाधिक फटका बसला आहे. आधी लॉकडाऊन आणि त्यानंतर सरकारने कार्यक्रमांवर घातलेली बंदी आणि निर्बंध यामुळे या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.
सरकारतर्फे या व्यावसायिकांना कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे आता या व्यावसयिकांच्या संघटनेतर्फे वर्धा इथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा इशारा या व्यावसायिकांना दिला आहे. कार्यक्रमाआधी RTPCR चाचणीची सक्ती त्वरित रद्द करा, किमान लग्न समारंभासाठी २०० लोकांना परवानगी द्या अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
तसेच प्रशासन कारवाईच्या नावाखाली फक्त वसुली करत आहे सर्व सामान्यांवर अत्याचार होतोय असाही आरोप त्यांनी केला आहे. १ तारखे पासून आम्ही आत्मनिर्भर होऊन व्यवसाय करणार सुरू आहोत, असा निर्धार या व्यावसायिकांनी केला आहे. आमचे सभागृह किंवा व्यवसाय सिल केल्यास आम्ही स्वतःहुन ते सिल तोडून पुन्हा व्यवसाय सुरू करू असा निर्धार या व्यावसायिकांनी केला आहे.