'नवीन जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा उभारा'
बीडच्या नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा, अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.;
बीड : बीडच्या नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा, अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. हीच मागणी घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय उपोषण करण्यात आलं आहे.
येत्या काही दिवसांमध्ये नवीन झालेल्या जिल्हा परिषद इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. परंतु या इमारतीच्या आवारामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय उपोषण करण्यात आलं आहे.
नवीन इमारतीच्या आवारात संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारला नाही तर जिल्हा परिषद इमारतीचं उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.