एल्गार परिषदेचा व्हिडिओ मागवला; आक्षेपार्ह वक्तव्य आढळल्यास पुढील कारवाई - अनिल देशमुख

एल्गार परिषदेचा व्हिडिओ मागवला असून त्यातील भाषणांची चौकशी करू. त्यात काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली आहेत का, याची तपासणी केली जाईल. काही आक्षेपार्ह आढळल्यास पुढील कारवाई होईल असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज सांगितलं आहे.;

Update: 2021-02-01 10:10 GMT

30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद पार पडली. २०१७ साली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. यंदा ही परिषद पुण्यात पार पडली. या परिषदेत लेखक अरुंधती रॉय, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, राजा वेमूला हे प्रमुख वक्ते होते. या सर्वच वक्त्यांनी अनेक मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या सभेत अनेक पुरोगामी नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची सहभागी झाले होते. २०१७ ला या वरिषदेवरून जोरदार वादंग उठलं होत. त्याची पुनरावृत्ती होऊ नाही म्हणून महाविकास आघाडी सरकार आधीच खबरदारी घेताना दिसत आहे. संपूर्ण परिषदेचा व्हिडिओ राज्य सरकारनं मागवून घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

शर्जीलच्या उस्मानी यांनी एल्गार परिषदेत भाषण करताना 'हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपनं याची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'एल्गार परिषदेचा व्हिडिओ मागवला असून त्यातील भाषणांची चौकशी करू. त्यात काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली आहेत का, याची तपासणी केली जाईल. काही आक्षेपार्ह आढळल्यास पुढील कारवाई होईल. मात्र तपास होईपर्यंत त्याबद्दल अधिक काही सांगता येणार नसल्याचे म्हंटल आहे.

2017 ला एल्गार परिषद वादग्रस्त का ठरली होती?

2017 पासून एल्गार परिषदेला वादाची किनार लागली आहे. 1 जानेवारीला हजारो दलित अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. पण 2018 ला भीमा-कोरेगाव येथे मोठा हिंसाचार घडला. या ठिकाणी जाळपोळ, दगडफेक, अनेक वाहनांची तोडफोड झाली. हे जे सगळं घडलं त्याच्या आदल्याच दिवशी पुण्यातील शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली होती. परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी हा सगळा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी या परिषदेचा संबंध कोरेगावच्या हिंसाचाराशी जोडला होता. त्यातून परिषदेशी संबंधित अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. या परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खालिद, सोनी सोरी व बी.जी. कोळसे पाटील यांच्यासह अनेक लोकांनी सहभागी झाले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा या परिषदेला परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला होता. सुरुवातीला पुणे पोलिसांनी परिषदेला परवानगी नाकारली होती. मात्र, आंदोलकांनी कोणत्याही परिस्थिती परिषद भरवण्याचा पवित्रा घेतल्यानंतर परवानगी देण्यात आली होती.

Tags:    

Similar News